II हीरक महोत्सवी II

श्री शाहू तरुण मंडळ सार्वजनिक वाचनालय,

सिद्धनेर्ली ता.कागल जि. कोल्हापूर

II शिक्षण सेवा ज्ञान त्याग II


मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० शासन मान्यता
रजि क्र . ई .५२९ जीजीआर १८८२५/४१
स्थापना दि.०१/०९/१९६५ दि.०७/०३/१९७४

वाचणे हा एक उत्तम छंद आहे. वाचन वेगवेगळया भाषेत करता येते. मातृभाषेतून केलेले वाचन वाचायला आणि समजायला सोपे जाते. वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात 'वाचाल तर वाचाल' अशी म्हण प्रचलित आहे.

वाचनातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. वाचनासाठी मन एकाग्र करवा लागते त्यातून आपला मानसिक विकास होतो. वाचनाने स्मरणशक्ती सुधारण्यास तसेच विचार कौशल्यात वाढ होते.कथा कादंबरी, विनोदी साहित्य वाचून आपले मन आपण प्रफ्फुलीत करू शकतो.सर्वात महत्वाचे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शब्दात,

विद्ये विना मती गेली।
मती विना निती गेली॥
  निती विना गती गेली।
गती विना वित्त गेले।।
  वित्त विना शुद्र खचले।
एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥

“ स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ” आणि वाचनालयाचा “ हीरक महोत्सव” असा योग साधून आम्ही समाज विकास केंद्र संचालित स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या पुढाकारातून सिद्धनेर्ली ग्रामस्थांच्या सहकार्याने राजर्षी शाहू तरुण मंडळ सार्वजनिक वाचनालयाला बाळसे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

त्याकरिता आम्ही सिद्धनेर्ली गावातील १०० विद्यार्थांना वाचन संस्कृती वाढविण्यासाठी १ वर्षाकरिता वाचनालयाचे मोफत सभासदत्व देणार आहोत. तसेच वाचकांना १५००० पुस्तकांपैकी आपल्या आवडीचे पुस्तक तात्काळ शोधता यावे याकरिता vachuaanande.in नावाने आपल्या वाचनालयाची वेबसाईट तयार केली आहे. ज्याधारे सदर वाचनालय अधिकाधिक वाचकस्नेही बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे .आता वाचक आपल्या घरातूनही आपल्याला हवे असणारे पुस्तक वाचनालयात उपलब्ध आहे किंवा नाही याची माहिती घेवू शकतात. तसेच आपल्याला हवे असणारे पुस्तक घरातून शोधून केवळ त्या पुस्तकाच्या क्रमांकाच्या आधारे काही वेळातच पुस्तक शोधू शकतात.

चला तर मग ‘ वाचू आनंदे ’...